ट्रम्पपर्व

मी महाभारत अगदी सुरवातीला वाचायला घेतलं होतं तेव्हा कादंबरीची वर्गवारी पर्वानुसार केल्याचं आठवतंय. भीष्मपर्व, द्रोणपर्व, कर्णपर्व इ.. माझ्या २०१६-१७ ‘इंडीया ट्रीप’ला मी ‘ट्रम्पपर्व’ असं नाव दिलं तर वावगं ठरणार नाही.

मुळातच कुणी परदेशाहून काही दिवस भारतभेटीवर आलं की त्यांना भेटायला येणारे बिल्डींगमधली मंडळी, दूरचे (कुणाच्या तरी मुंज/लग्न/पंच्याहत्तरी ह्या आणि फक्त ह्याच समारंभांना भेटणारे) नातेवाईक हा मुळातच माझ्यासाठी आधीपासून कौतुकाचा विषय (आणि विनोदाचाही!)! म्हणजे “काय मग काय कसं काय चालुए ‘तुमचं’ ‘तिथे’??”’ने जी काही प्रश्नावलीची ट्रेन सुटेल ती मध्ये कोणकोणत्या स्टेशन्सवर थांबेल ह्याचा कयास लावणं मुळातच अशक्य! हा डीसेंबर पकडून मी गेली ४ वर्ष दरवेळी मुंबईला येतोय पण ह्यावेळी ‘डोनाल्ड ट्रम्प’साहेबांबद्दलची लोकांची ‘क्युरिऑसिटी’ बघुन मी खरंच चक्रावून गेलो.

शेजारचे फडके आजोबा सकाळी भेटायला आले होते. मी गेली ४ वर्ष तिथे वास्तव्यास असल्याने मला मतदानाचा अधिकार मिळाला असणार हे त्यांनी गृहीतच धरलेलं आणि मी कोणाला मत दिलं ह्याची चपापणी त्यांनी केली. “आपला वरचा जन्या करतो मतदान तिकडे.. तुला का देत नाहीत राजा??”.. “अहो पण जन्याला ‘अ..आय मीन’ जनार्दन काकांना तिकडे सेटल होऊन किती वर्ष झाली?”.. “२५”.. “मग आजोबा.. असं काय करता??”

परवा फोनवर ‘रनकीपर ॲप’ सुरू करून जॉगर्स पार्कमध्ये धावायला गेलो तो समोरून सुपारी खात येणाऱ्या कामत काकांच्या अडकित्त्यात मी आयता सापडलो. कामत काका आमच्याइथल्या संघ-शाखेचे प्रमुख.. साधारण पन्नाशीतला माणूस. पांढरा शर्ट आणि खाली खाकी हाफ पॅंट या त्यांच्या गणवेशात पार्कातल्या पारावरच्या गणरायाला सॅल्युट ठोकून (प्रसादावर नंतर सुपारी घेऊन) ते कवायत करायला चालले होते. मला गेटवरंच गाठलं.. ISISला नेस्तनाबूत करण्याचा ‘मास्टरप्लॅन’ भारताचे मोदी, अमेरिकेचे ट्रम्प आणि रशियाचे पुतीन यांनी संयुक्तरीत्या बनवलाय आणि त्यामुळे सबंध जगातील दहशतवादी संघटनांमध्ये कशी घबराट पसरलीये हे त्यांनी मला साभिनय पटवून देण्याचा प्रयत्न केला. (बहुदा हीच त्यांची कवायत!) अमेरीकेतून भ्रमंती करता करता रशिया, चीन, गुजरात, दिल्ली, इराक, सिरीया, लिबिया, दुबई अशा अनेक ठिकाणी कामतकाकांचं फ्लाईट लॅंड झालं(आपल्या मोदींसारखच). आपली ५६ ईंची छाती फुलवून ‘मास्टरप्लॅन’विषयी सांगणारे कामत काका (माझ्या नशीबाने) काकूंच्या फोनने पार्ल्यात परतले. काकूंना नारळपाणी हवं म्हणून त्यांनी पळ काढला.. वर त्यात “ये एकदा संध्याकाळी चहा-पाण्याला, बोलू सविस्तर!” असं आमंत्रण!! घड्याळात ८ वाजलेले.. सकाळचं आंघोळीचं पाणी जाईल म्हणून ‘रनकीपर ॲप’ बंद करून मी घरी!

बी-विंगमधले मुळ्ये सर तर वेगळाच प्रकार.. ते अजूनही आमच्या पार्ले टिळक शाळेत इतिहास शिकवतात पण म्हणून आपल्याला सगळं जागतिक राजकारण ‘अगदी पैकीच्या पैकी’ कळतं असा त्यांचा गोड गैरसमज. मी संध्याकाळी ६:३५ ला तुला भेटायला येतो असं फोनवर सांगून सर बरोब्बर ६:३५ ला आले. मग जॉन केनडी, निक्सन, अब्राहम लिंकन, बुश पितापुत्र, रोनाल्ड रेगन, बिल क्लिंटन, ओबामा ह्यांनी अमलात आणलेल्या बऱ्यावाईट निर्णयांची ऊजळणी झाली आणि ह्या सर्व ऐतिहासिक परामर्शानंतर तुमचा ट्रम्प (च्यायला कमाल आहे.. आमचा ट्रम्प? आमचा??) कसा पानीकम आहे हे सांगून मुळ्येसरांनी त्यांचा ‘इतिहासाचा तास’ संपवला (घरी आईने केलेल्या साबुदाणा वड्यांवर चांगला आडवा हात मारून).

काल वरची मेधाताई येऊन गेली. तिने मात्र नेहमीप्रमाणे खूप आपुलकीने चौकशी केली. डॅल्लस, न्यूयॉर्क मधल्या काही ‘रेसीझम’ च्या घटना तिने पेपरमध्ये वाचल्या होत्या पण तुला त्याचा काही त्रास नाही ना झाला? वगैरे प्रश्न आणि नंतर एक कॅरमचे ३-४ डाव खेळता खेळता गप्पा मारून “चल रे शहाण्या.. सुट्टीवर तू आहेस, मी नव्हे!!” असं म्हणत मेधाताई वर निघाली. “परवा सकाळी ये रे.. शिरा बनवते तुझ्यासाठी” सांगायला ती विसरली नाही.

आमच्या खालचा किशोरदादा तर भलताच आक्रमक.. त्याच्यामते ट्रम्प विजयी झाल्याने तेथिल समस्त भारतीय ‘वर्किंग क्लास’ च्या ‘डॅश-डॅश’ या ठिकाणी ‘डॅश-डॅश’ आले आहेत. तरीही मी अजून ५ वर्ष अमेरीकेत जॉब करून एखाद्या मोठ्या पोस्टसाठी ‘फिल्डिंग’ लावावी आणि कंपनीमध्येच भारतीयांची युनियन वगैरे सुरू करून ट्रम्पची ‘डॅश-डॅश’ मारावी असा त्याचा मला सल्ला. गाळलेल्या जागा भरण्यास वाचक सुज्ञ आहेतच. परवा घरी येऊन हे सगळं तो बडबडून गेला. मग मी त्याला त्याच्या हिंदुस्तान युनिलिव्हर मधल्या एक-दोन ‘मॅटर्स’बद्दल विचारलं तर कुणा अण्णाभाऊ आणि दादासाहेबांबरोबर मीटींग आहे रे सांगून किशोरदादा पळाला. एअरपोर्टहून घरी येताना जागोजागीच्या होर्डिंग्स वर मला ह्या अण्णाभाऊ आणि दादासाहेबांचं दर्शन झाल्याचं एकदम ‘क्लिक’ झालं. कदाचित पुढच्या ‘इंडिया ट्रिप’ला आमचा किशोरदा पण बसलेला दिसणार त्यांच्या साथीला!!

नाडकर्णी आजी नेहमीप्रमाणे ‘रघुवीर स्टोअर्स’ ची आंबा बर्फी घेऊन मला भेटायला आल्या. इथे मराठी-परप्रांतीय राजकीय वादात जशी परप्रांतीयांची पाचावर धरण बसते तसंच काहीसं अमेरिकेत ट्रम्प निवडून आल्याने भारतीयांचं झालं असावं असा त्यांचा समज. त्यामुळे, आता ट्रम्प आले ना निवडून? मग तुझं कसं काय तिथे? पोटापाण्याचा काय व्यवसाय करतोस बाळा? असा त्यांचा भाबडा प्रश्न! पण नोकरी वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे हे कळल्यावर त्याही खुश झाल्या.

आमच्या केदारनाथ सोसायटीमध्ये मानेकाकांना भारतापेक्षा बाकी देशांची माहिती फार (जरा जास्तच!!) आणि ह्या देशांविषयी समोरच्याशी उगाचच वितंडवाद घालणे हा त्यांचा आवडता टाईमपास. ते एकदा आले की किती वेळ खातील ह्याचा बिलकूल नेम नाही म्हणून बाबांनी त्यांना “जेवण झाल्यावर आईसक्रीम खायला या” असं सांगितलं. तसे मानेकाका ९:३० ला आले आणि “काय हो तरूण.. काय म्हणत्येय तुमची अमेरीका?”… “मस्त” एवढंच मी म्हणालो. आईने तोपर्यंत आईसक्रीम आणलं होतं. “ह्या ट्रम्पमुळे अगदीच बदललं ना सगळं?” खरतर “हो” म्हणालो असतो तर पुढचे २ तास वाचले असते पण मी प्रांजळपणे “नाही ओ.. एवढं काही नाही” असं म्हटलं आणि झालेली चूक लगेच लक्षात आली. “काय नाही?? मग आम्ही ‘इंडीया टीव्ही’वर बघतो ते खोटं की काय??” ह्यानंतर मानेकाकांनी व्हाईट हाऊस, अमेरिकेचं शिष्टमंडळ, अमेरिकन सैन्याची शस्त्रसज्जता, डोनाल्ड ट्रम्प, त्याच्या २ का ३ अर्धांगिनी, त्यांची ती ५ मुलं ह्या सगळ्यांच्या खाजगी, सामाजिक आयुष्याबद्दल एवढी ‘डीटेल’मध्ये माहिती दिली कि ‘इंडीया टीव्ही’वर ‘इंडीया’शी संबंधित काहीच दाखवत नाहीत का असा प्रश्न मला पडला. तो मी ‘अव्हॉइड’ केला कारण घड्याळात रात्रीचे ११:३० वाजलेले दिसत होते. “तू दरवेळी कशाला मानेकाकांशी वाकड्यात शिरतोस रे?” म्हणत ते गेल्यावर घरच्यांनी मला फैलावर धरलं ते वेगळंच. अरे.. कमाल आहे! मी काय केलं??

असो, तर असं हे ट्रम्पपर्व.. अगदी जस्सच्या तस्सं!! ‘मल्टीटास्कींग’च्या आजच्या ‘डीजीटल’ युगात एकाच वेळी जशा अनेक गोष्टी करता येतात तशाच एकाच वेळी एकाच माणसाला अनेक गोष्टी सोसाव्याही लागतात. त्यामुळे ह्या पर्वातला अर्जुनही मीच आणि श्रीकृष्णही.. संजयही मीच.. ह्यातले व्यासही मीच, गणपतीही मीच..

ह्या पर्वाचा आता शेवट..

थांबा!..

बेल वाजली दारावरची.. कोण आलंय बघून येतो!!

  – निखिल असवडेकर

One thought on “ट्रम्पपर्व

  1. हाहाहाहा…. मस्त!!! मी एकटीच हसत होते वाचताना 🙂 🙂 तुझ्या लिखाणात खूपसा पु. ल.चा भास होतो. Keep it up (y)

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s