अमर जगताप

अमर जगताप! अमेरिकेत आल्यावर जे काही मोजके जिवाभावाचे मित्र जोडले गेले त्यातला अमर हा असाच एक! मी अमेरिकेत येण्यापूर्वी एक गोष्ट मनात पक्की करून आलो होतो.. आता काय आपले शाळेसारखे जिवलग मित्र मैत्रिणी होणार नाहीयेत.. आता ज्या होतील त्या फक्त ओळखी!! हसावं, खिदळावं, २ जोक्स मारावे, जोक्स ऐकावे.. मग आपापल्या वाटेने जावं. बाकी कसलीही अपेक्षा करू नये. तुझं सुखदुःख तुझ्याकडे, माझं माझ्याकडे!! ह्या माझ्या विचारसरणीला छेद देणारा अमेरिकेतला पहिला हा अर्थातच अमर जगताप. त्या दृष्टीने मित्र म्हणून अमर कायमच स्पेशल राहील.

अमरची आणि माझी पहिली भेट २९  डिसेंबर २०१२ ची.. जेव्हा युनिव्हर्सिटी ग्रुप तर्फे अमर मला आणि माझ्यासारख्या मुंबईहून येणाऱ्या बऱ्याच जणांना एरपोर्टहून पिक अप करायला आला होता. माझा अमेरिकेतला पहिला दिवस. २०१२ मध्ये शाहरुखचा ‘जब तक है जान’ रिलीज झाला होता. त्यामुळे अमर तेव्हा ‘मेजर समर आनंद’ सारखा दाढी मिश्यांची खुंट ठेवून आणि आर्मी जॅकेट घालून वावरत असे. साधारण ५ फूट १० इंच उंच..  टीशर्ट, (उन्हाळा नसला तर)लेदर जॅकेट आणि जीन्स हा आवडता पेहराव! एकदा घातलेला टीशर्ट सहसा परत अंगावर दिसणार नाही. गोरागोमटा, सतत कसला तरी ठाव घेण्याच्या ईर्ष्येने लुकलुकणारे डोळे, ऐटबाज नाक! मूडमध्ये असला की डाव्या हाताचा  अंगठा आणि मधल्या बोटात एक सिगरेट पकडलेली असते आणि तर्जनीने तिला उगाच टपलीत देत असतो.. लहर आली की पेटवतो. हो, पण..अमर चेन स्मोकरबिलकुल नाहीये बरं का. शाहरुखच्या येत्या सिनेमात जसा लुक असेल त्या प्रमाणे अगदी शिस्तीने अमरच्या अंडाकृती चेहऱ्यावर दाढी असते किंवा नसते! कमावलेलं शरीर..  उजव्या हातातलं कडं तर अगदीच बाप! उजव्या दंडावर अमर ने त्याच्या बाबांच्या चेहऱ्याचा टॅटू गोंदवून घेतलाय. बऱ्याचदा टाईट फिट किंवा स्लीव्हलेस टीशर्ट घालून हा टॅटू तो अभिमानाने मिरवतो. केसांची स्टाईलही  डिट्टो शाहरुख! तुम्ही त्याला पहिल्यांदा भेटत असाल तर “मैं अमर.. नाम तो सुना होगा!” हे दिल तो पागल हैंच्या “मैं राहुल.. नाम तो सुना होगा!” स्टाईल मध्ये तो म्हणून दाखवेल पण त्याला वेड्यात काढू नका.

टेक्सास मध्ये शिकत असताना मी, आदित्य आणि ऋत्विक असे तिघे कूपर चेस २१०मध्ये रूममेट्स होतो आणि अमर बाजूला २११ मध्ये आमचा शेजारी. ऋत्विक आणि अमर मेकॅनिकल इंजिनीरिंगला एकाच वर्गात त्यामुळे असाईन्मेंट्स, अभ्यास काही ना काही कारणाने अमर बऱ्याचदा आमच्याच घरी असायचा. आमच्या आवडीनिवडी पण बऱ्याच सारख्या आहेत हे हळूहळू कळत गेलं. आम्ही दोघंही शाहरुख-वेडे‘!!. मी अमर एवढा शाहरुखला फॉलो करत नसलो तरी ह्या एका कॉमन टॉपिकमुळे, मैत्रीच्या सुरवातीपासूनच आमच्यातला संवाद कायम राहिला.  परत अमर अफलातून चहा बनवतो..फुल-ऑन भैय्याच्या टपरी सारखा! आमच्या अपार्टमेंट च्या कूपर चेसव्हॉट्सऍप ग्रुप वर सकाळी ८-९ वाजता मेसेज यायचाच – “चहा तयार आहे”. मग आम्ही बाजूला जायचो किंवा अमर सरळ आमच्याच घरी येऊन चहा बनवायचा. चहा घेता घेता आम्ही शाहरुखचे जुने मूव्हीज, इंटरव्ह्यू बघत वेळ घालवत असू.स्वदेस‘, ‘बाजीगर‘  आणि डरआमच्या अपार्टमेंट मध्ये इतक्या वेळा लागलेयत कि कदाचित डायरेक्टर/एडिटर ने पण ते पिक्चर इतक्या वेळा बघितले नसतील.आपल्याला शाहरुख एवढा का आवडतो ह्याचा कधी तू विचार केलायस निखिल? पडद्यावर चे हे नायक-नायिका खरंतर आपले कोणीच नसतात.. ना त्यांचा कधी भविष्यात आपल्याशी डायरेक्ट संबंध येण्याची सुतराम शक्यता असते. पण आपल्या अगदी रांगण्यापासून ते तरुण होताना ह्या ऑलरेडी तरुण हिरो/हिरोईनचं  त्या फेजमधलं हसणं, रडणं, आपटणं, झिडकारलं जाणं, हरणं, जिंकणं आपण आपल्याशी रिलेटकरतो.. नकळत मनाशी कुठेतरी साठवून ठेवतो.. तुझ्या किंवा माझ्या बाबतीत मनाचा हा हळवा कोपराम्हणजेच शाहरुख खान!” मला शाहरुख खान का आवडतो ह्याचं इतकं सुंदर एक्सप्लेनेशनमला कधीच देता आलं नसतं.

अमरशी तुमची थोडी गट्टी जमली कि अनेक गोष्टी तो तुम्हाला सतत ऐकवत राहतो. असाच त्याने मला एकदा त्याच्या कुटुंबाचा सगळा इतिहास सांगितलं होता. त्याच जगताप कुटुंब म्हणे मूळ धुळ्याचं पण ४०० वर्षांपूर्वी ते काशीला स्थायिक झाले आणि नंतर परत कधीतरी ह्या मागच्या १०० वर्षात महाराष्ट्रात परतले. अर्थात ह्या गोष्टींवरचा अमरचा गाढा विश्वास आणि पॅशनेटबडबड एवढाच ह्याला पुरावा. शिवछत्रपतींच्या काळी म्हणे कुणी जगताप नावाचे जहागीरदार होते ते अमर चे खापरx4 पणजोबा. त्यांना शिवरायांनीच म्हणे काशीक्षेत्री गुप्तहेर म्हणून ठेवलेलं. त्यामुळे हेरगिरी हा मूळ धंदा आणि जगताप ऐवजी जोशी हे आडनाव लावून भिक्षुकी, पौरोहित्य हा जोडधंदा. ही हेरगिरी म्हणे पिढ्यान्पिढ्या नंतर दुसऱ्या बाजीरावाच्या काळापर्यंत चालू होती. आता अर्थात ह्याला ऐतिहासिक पुरावा बिरावा काही नाही..  अमर म्हणतो म्हणून आपण हो हो करायचं.  एकदा अमरला आमच्याच एका मित्राने विचारलं होतं काय रे एवढे मोठे गुप्तहेर नि काय नि काय सांगतोस कधी वाचल्याचं आठवत नाहीये ह्या जगतापांबद्दल? “लेका, गुप्तहेरांची नावं अशी कुठे नोंदवून ठेवतात होय? बावळट!!” अमर क्षणाचीही उसंत न घेता बोलून गेला.. असो.

अमरची अजून एक विचित्र सवय म्हणजे हा मुलगा कायम अगदी टापटीप कपड्यांत असतो. अगदी घरी घालायचे कपडे पण हा इस्त्री वगैरे करून वापरतो. “हे बघा, प्रत्येकाला कशा ना कशाची आवड असते बरोबर?? तुला कसली क्रिकेटची आवड आहे.. तुला काय वाचायची आवड आहे. मला फॅशनेबल रहायला मजा येते. मी गबाळा दिसणं is my worst nightmare. मला आवडतं कायम चांगले कपडे घालायला.. कायम चांगलं आणि प्रेसेंटेबल दिसायला!! ह्यात तुम्हाला एवढा काय प्रॉब्लेम आहे?”  असं एकदा अमरने मला आणि आदित्यला सुनावलेलं. तेव्हापासून आम्ही त्याच्यासमोर हा विषय काढत नाही.

एकदा शनिवारी अमर ने त्याच्या खास स्टाईलने मस्त भरली वांगी केली होती. त्यावर ताव मारून झाल्यावर आम्ही असंच बाल्कनी मध्ये गप्पा मारत बसलो होतो आणि एकेक जुने विषय निघत होते. अमरने भरली वांगी केली की मुंबईचा टॉपिक निघतोच निघतो. “अरे माझी आई कसली जबरदस्त बनवते ही भाजी काय सांगू तुम्हाला.” आपण मुंबईला असताना भेटलो असतो सगळे तर काय मजा आली असती ना वगैरे वगैरे.. अमर सांगत होता, ”२५ वर्ष पूर्ण झाली तरी अजून काय करायचं ते ठरत नाहीये रे निखिल. एकदा वाटतं वेगळंच काहीतरी करावं, घुसावं च्यायला मॅनेजमेंटमध्ये!” ह्याची बॅकस्टोरी अशी की अमर ला खरंतर आर्ट्समध्ये करिअर करायचं होतं पण १० वी मध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त मार्क्स पडले आणि त्यात त्याचं आर्ट्सच स्वप्न वाहून गेलं. आईच्या आणि मामा-मामीच्या सांगण्यावरून त्याला सायन्स घेणं भाग पडलं. १२ वी नंतर त्याला वाटलं शेफहोण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंट ला प्रवेश घ्यावा पण तेव्हाही कळपातल्या मेंढरांसारखं चालत मी इंजिनीरिंग घेतलं. “अर्थात मी आईला-मामाला बिलकुल दोष देत नाहीये.. यह जिंदगी नफरत के लिये बहुत छोटी हैं”  अमर इमोशनल झाला की शाहरुख खान बाहेर येतोच.. “पण काही ना काही कारणाने मी माझी आवड मारत आलोय निखिल.”

अमर च्या आयुष्यातील ही अनिश्चितता जेवढी खरी तेवढंच हे ही खरंय की अमर हा बिनदिक्कत कठीण परिस्थितीतून वर आलेला आहे. अमर चे आजोबा रमाकांत जगताप मुंबईतले तेव्हाचे कुख्यात गुंड होते. तेव्हाच मुंबईचा डॉन करीम लाला च्या गॅंग मध्ये ते काम करायचे. पठाण गॅंग(करीम लाला) आणि दाऊद गॅंग ह्यांच्यात तेव्हा विस्तव जात नसे. ह्यात होरपळलेल्या अनेक कुटुंबांपैकी जगताप कुटुंब हे एक. आजोबांनी तस्करीच्या धंद्यात चिक्कार मालमत्ता जमवली होती. अमर चे बाबा मिलिंदकाका मात्र ह्या सगळ्या गुन्हेगारी जगापासून लांब राहिले. ते लालबाग ला गिरणी कामगार होते आणि आई बालमोहन शाळेत शिक्षिका. तेव्हा वरळी येथे २ बेडरूमच्या मोठ्या फ्लॅट मध्ये जगताप कुटुंब राहत असे. एकदा फिरायला गेले असताना रमाकांत आजोबा, अमर चे बाबा मिलिंदकाका आणि अमरची मोठी बहीण रीना यांचा भर बाजारात दाऊद गॅंग ने काटा काढला होता. ही घटना १९९३ मधली. अमर जेमतेम ४ वर्षाचा होता. तो आणि आई घरी असल्यामुळे वाचले. पण मग आईने हे वरळीचं घर सोडून त्यांच्या मूळ गावी रत्नागिरीला जायचा निर्णय घेतला. त्यामुळे १२ वी पर्यंत अमर चं शिक्षण तिथे रत्नागिरीत झालं. दाऊद गॅंग च्या छोटा राजन ने तर सगळ्या जगताप कुटुंबाला संपवायचं ठरवलेलं. नंतर २ वर्षांनी अमरचे सख्खे काका आणि बायको, २ मुलं असं त्यांचं पूर्ण कुटुंब चाळीतल्या एका बिऱ्हाडाला आग लागून त्या अपघातात खाक झालं. त्यामुळे अमरच्या आईचा मुंबई सोडायचा निर्णय योग्यच म्हणायचा!  ६ वर्षांच्या मुलाला आपले बाबा नाहीत आणि तर आता आपले काकाही कधी आपल्याला दिसणार नाहीत हे कुठे थोडं थोडं कळायला लागलं होतं. ‘मी लहान होतो तेव्हा काका मला गोटूलाल म्हणून हाक मारायचे’ अशी आजही काकांची आठवण अमर सांगतो. नंतर इंजिनीरिंगच्या वेळी तर त्यांना मुंबईला यावं लागलं पण तोपर्यंत गॅंगवॉरही बऱ्यापैकी निवळलं होतं. अमरची स्वप्न वेगळीच होती पण आई कायम अमरला जखडून ठेवायची. जवळपास संपूर्ण कुटुंब गमावणाऱ्या स्त्री कडून फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उठून जग कवेत घेण्याची अपेक्षा बाळगणं हे आततायीच! ह्या अशा कल्पना फक्त सिनेमांमध्येच छान वाटतात. तसंच हा काळा अध्याय आपण कायमचा पुसून टाकूया, नवऱ्याचा वाममार्गाने मिळवलेला पैसा मला बिलकुल नको असे अनाठायी निर्णयही काकूंनी घेतले नाहीत कारण त्यांच्या डोळ्यासमोर अमर होता. कितीही नाही म्हटलं तरी जगायला पैसा लागतोच आणि त्यांची गावाकडची परिस्थितीही काही खास अशी नव्हती. त्यामुळे त्यांनी तेव्हा म्हणजे १९९३ मध्ये मुंबईतला त्यांचा राहता वरळीचा फ्लॅट आणि मिलिंद काकांच्या नावावर असलेल्या बांद्रा येथील २ जागा विकल्या आणि बँकेत हे पैसे गुंतवून त्या रत्नागिरीकडे निघाल्या. दोघांच्या भविष्याची आणि पुढे अमरच्या शिक्षणाची ही एकप्रकारे तजवीजच होती. अमर च्या त्याच्याविषयीच्या स्वप्नांना काकू का आवर घालत असतील हे मला कळलं नाही पण अमरनेही बाकीच्यांप्रमाणे डॉक्टर, सीए  किंवा इंजिनीअर व्हावं. उगाच नको त्या फंदात पडू नये असं त्यांचं कायमच मत होतं.

अमर इंजिनीरिंग ला असतानाच पहिल्या काही महिन्यात आयपीएस ऑफिसर विश्वास नांगरे पाटील सरांच्या एका सेमिनार ला गेला होता आणि तेव्हापासून त्याने आपण यूपीएससी च्या परीक्षेची तयारी करायचीच हे ठरवून टाकलं. पण कुणाचं नशीब कुणाला कुठे आणुन सोडतं बघा.. अमर आमच्याबरोबर इथे टेक्सास मध्ये आला. आठवड्यातून एकदा तरी पॉलिटिक्सचा, भारतीय राजकारण्यांचा विषय निघायचाच आणि मग अमर स्वतःलाच शिव्या घालत  बसायचा.

अमर मुंबईत इंजिनीरिंग करत होता तेव्हा ‘फायनल इयर’ला शिवसेनेतर्फे युनिव्हर्सिटी सिनेट इलेक्शनला स्टुडन्ट सेक्रेटरी म्हणून उभा राहिलेला. हे प्रकरण जीवावर बेतणार होतं पण नशीबच बलवत्तर म्हणायचं! एकदा रात्री चर्चगेटहून घरी परत जात असताना अमर ला एका रिक्षावाल्याने उडवलं आणि नंतर त्या रिक्षामधल्या दोघांनी हॉकीस्टिकने अमरला मरेस्तोवर मारलं. हा २ तास तसाच बेशुद्ध चर्नीरोड स्टेशन जवळ पडून होता आणि नंतर कुणीतरी त्याला हॉस्पिटलला भरती केलं. ह्या घटनेचा एक मुख्य परिणाम म्हणजे अमर ने राजकारण पूर्ण सोडलं. अर्थात एवढं सगळं घडल्यावर काकूंनी पुढे परवानगी दिली नसतीच. अमरचं म्हणणं असं कि हा हल्ला कोणी केला का केला ह्याचा तपास काही पुढे नीट झाला नाही. आणि हॉस्पिटल ला ऍडमिट झाल्यावर उपचाराचा खर्च आणि बाकी सहानुभूती सोडली तर पक्षानेही हे प्रकरण पुढे दाबून धरलं नाही.. त्यामुळे हा अंतर्गत राजकारणाचाही भाग असू शकतो. ह्या सगळ्या लफड्यात अमरचं एक वर्ष मात्र उगाच फुकट गेलं. ४ महिने तर तो हॉस्पिटल मध्येच होता आणि मग घरी आल्यावर महिन्याभरात रिकव्हर झाला. फायनल इयर ला पुन्हा बसावं लागणार होतं सो ह्या मधल्या ६ महिन्यात तो एका गॅरेज वर मेकॅनिक म्हणून कामाला लागला होता. घरी नुसता लोळत पडून राहण्यापेक्षा हे बरं असं त्याने ठरवलं. मग इंजिनीअर झाला आणि पुढे मास्टर्स करायला इथे अमेरिकेला आला. मला अमर एकदा म्हणाला होता मी अमेरिकेला येतोय ह्याचा मामाला माझ्यापेक्षा जास्त आनंद! रत्नागिरीला गावजेवणाचा बेत आखलेला मामाने. हा मामा पण काय करेल ना.. माझ्यावर खूप जीव आहे बिचाऱ्याचा!!  

कूपर चेसमध्ये पाहिलं दीड वर्ष म्हणजे सॉल्लिड धमाल होती. नंतर हळूहळू सगळे ग्रॅजुएट झाले आणि लोकांची तोंडं वेगवेगळीकडे वळायला लागली. माझी इंटर्नशिप आणि अमरचा जॉब हयूस्टन मध्येच पण आम्हा दोघांमध्ये जवळपास २ तासांचं अंतर आणि आम्ही दोघंही पब्लिक ट्रान्सपोर्ट वर अवलंबून त्यामुळे पूर्ण ६ महिन्यात आमची फक्त एकदाच भेट झाली.  तेव्हा आम्ही इंडियन रेस्टॉरंट मध्ये दाबून ताव मारला होता आणि चांगल्या ४ तास गप्पा हाणल्या होत्या. नंतर भेटू असं बोलणं तर झालं पण नंतर आमची प्रत्यक्ष भेटच झाली नाही. मग सहा महिन्यांनी मीही ग्रॅज्युएट झालो आणि व्हर्जिनियाला आलो. १७ डिसेंबर २०१४ ला ह्युस्टन च्या वेस्टहायमर रोडच्या बॉलीवूड प्लाझारेस्टॉरंटमध्ये ते शेवटचे २ वेटर, ‘आम्ही उठतो कधी आणि ते रेस्टॉरंट बंद करतात कधीम्हणून रात्री ११:३० वाजता आमच्याकडे नजर लावून बसलेले मला आजही आठवतायत. आता वाटतं.. निर्लज्जपणे आणखी काहीवेळ तिथेच थांबून अजून गप्पा झोडायला हव्या होत्या.

२ वर्षांपूर्वी अमरचं ईशा बरोबर लग्न झालं. ते दोघं ६ वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये होते. बाकी सगळ्या गोष्टीत पैशांसाठी पुढेमागे न बघणाऱ्या अमरने लग्न मात्र अगदी साधेपणाने केलं. त्यांचे तसेही नातेवाईक हाताच्या बोटांवर मोजण्याएवढे आहेत असं एकदा तो मला म्हणाला होता. त्यामुळे लग्नाला ह्याच्या बाजूने फक्त आई, मामा-मामी आणि ईशाची फॅमिली एवढेच होते. ईशा एका एनजीओ साठी तेव्हा काम करायची. ती समाजकार्य अगदी नेटाने करते आणि त्याची तिला आवडही आहे. दोघांनी मिळून हेमलकसा येथे घरचे वडीलधारे आणि प्रकाश आमटे – मंदाकिनी आमटे ह्यांच्या आशीर्वादाने लग्न केलं आणि जवळपास ५ लाख रुपये प्रकाश आमटेंच्या प्रकल्पाला निधी म्हणून दिले. महाराष्ट्र टाइम्स मध्ये तेव्हा पहिल्या पानावर अमर आणि ईशाचा फोटो छापून आला होता. “काय, तू तर आपल्या शाहरुख पेक्षा मोठा माणूस झालास की.. ” मी अमरला गमतीत म्हटलं.

अमरची जवळपास ५ वर्ष अमेरिकेत झाली होती आणि एक महत्वाचा निर्णय घेण्याची वेळ अमरवर आलीच. ईशा अमेरिकेत शिकली नव्हती आणि तिच्या शिक्षण आणि कामाच्या स्वरूपामुळे तिला अमेरिकेत काम करता येणं शक्य नव्हतं. तरीही साधारण वर्षभर ती अमर बरोबर ह्युस्टन ला राहिलीच पण पॉलिटिकल सायन्समध्ये आपण एवढे शिकलो आहोत आणि असं नुसतं बसून राहायचं हे काही तिला आणि अमरला दोघांनाही पटेना. शेवटी अमर आणि तिने खूप विचार करून परत इंडियाला जायचा निर्णय घेतला. अमरला अमेरिकेबद्दल किती प्रेम आहे हे आम्हाला सगळ्यांना माहित होतं त्यामुळे हा निर्णय त्याने घेणं म्हणजे सगळ्यांसाठी एक धक्काच होता.आजपर्यंत अनेक निर्णय घेताना मी माझ्यापेक्षा आईचा विचार जास्त करत आलोय. हा निर्णय ईशासाठी.. मी परत येणार म्हणजे आईपण खूप खूष होईलच. मला खूप आवडली अमेरिका आणि ईशाला बिलकुलच नाही. पण आता मी एक गोष्ट माझ्या मनासारखी करणारे.. कुणी काहीही सांगूदे. आता ३० वर्षांचा होईस्तोवर मी २ वेळा यूपीएससीला बसू शकतो तर आता गेल्यावर वर्षभर परीक्षेची तयारी करेन. आणि २०१८ ला ‘जय हो’ आणि समजा नाही झालं तर अजून जोमाने परत २०१९.. मिशन यूपीएससी!!” अमर निघायच्या आधी आमच्यात झालेलं हे बोलणं. अमर एप्रिल २०१७ ला कायमचा इंडियासाठी निघाला. त्यानंतर आम्ही महिनाभर संपर्कात होतो. मग अमर यूपीएससी च्या क्लासेस साठी दिल्ली ला रवाना झाला तेव्हा सगळ्या सोशल मीडियाच्या प्रोफाईल्स बंद करून गेला. एखाद्याचे दर आठवड्याला जे अपडेट्स यायचे ते काहीच मिळेनासे झाले. मीही कधी त्याला डिस्टर्ब केलं नाही. ईशाशी साधारण महिन्यातून एकदा फोन होतो तेव्हा अमर ची खबरबात कळतेच.

अमर आता पुढच्या महिन्यात UPSC परीक्षेला बसतोय आणि ईशानेही मुंबईतच तिची स्वतःची एक छोटी स्टार्ट-अप कंपनी परवाच सुरु केलीये. रस्त्याचं सुशोभीकरण, महानगरपालिकेच्या शाळांमध्ये टेकनॉलॉजि क्लासेसअसं त्याचं सुरवातीचं स्वरूप आहे. दोघांनाही शुभेच्छा!!

अमर जीवनाच्या/लाईफच्या लंब्याचौड्या बाता कधीच मारत नाही. जे होईल ते सहन करत पुढे जात राहायचं हे त्याचं सूत्र आहे आणि त्याची ह्याबद्दल बिलकुल तक्रार नाही. “मी माझ्या आयुष्याबद्दल स्वतःच्या हिंमतीवर आणि जबाबदारीवर निर्णय घेत असेन तर मला चुका करण्याचा, आपटून पाडण्याचाही तेवढाच अधिकार आहे.” असं अमर ने एकदा मला सांगितलं होतं. इतक्या खस्ता खाऊन आणि जगाचे बरे-वाईट अनुभव पचवून अमर आज दुप्पट पॅशन ने नवीन अनुभवाला सामोरं जायला तयार आहे. सगळ्याच बाबतीत शाहरुख खान ला फॉलोकरणाऱ्या अमरला स्वदेसचा मोहन भार्गव म्हणणं अगदीच टिपिकल होईल.. त्यालाही ते आवडणार नाही पण अमरच्या आवडत्या शाहरुखचाच ओम शांती ओममधला एक डायलॉग त्याच्यासाठी आणि कदाचित आपल्या सर्वांसाठी अगदी परफेक्ट लागू होतो – “हमारी फिल्मो कि तरह हमारी जिंदगी में भी एन्ड तक सबकुछ ठीक ही हो जाता है.. हॅपी एंडिंग!! और अगर ठीक ना हो तो.. वो दि एन्ड नहीं! पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!”

—————————————————–समाप्त——————————————————–

रत्ना काका

पार्ल्यात तेजपाल स्कीम मध्ये तुम्ही राहत असाल तर रत्ना काका माहित नसणं ही बाब केवळ अशक्यच! कदाचित अख्ख्या मुंबईत मुद्दाम मीटर नसलेली अशी एकमेव रिक्षा असेल आणि त्याचे सारथी म्हणजे आमचे रत्नाकर काका.

रत्ना काकांना रत्ना काका किंवा रत्नाकर काका का म्हणतात हे पार्ल्यात बहुतेक कुणालाही माहित नाही. आणि कुणालाही माहित नाही म्हणून कुणी खोलात जाऊन विचारायचाही कधी प्रयत्न केला नाही. पण त्यांच्या रिक्षाच्या मागे लिहिलेलं ‘रत्नाकर’ नाव हीच त्यांची ओळख बनली. आता हा रत्नाकर म्हणजे ते स्वतः, त्यांचे तीर्थरूप, त्यांचा मुलगा कि कोण अध्यात्मिक बाबा/बुवा आहे  देव जाणे. सगळे त्यांना त्याच नावाने हाक मारू लागले. माझ्या बाबांची पिढी त्याला डायरेक्ट रत्नाकर किंवा रत्ना म्हणायची. आम्हीही पंटर लोकांनी त्यांचं खरं नाव वगैरे जाणून घेण्याच्या फंदात न पडता त्यांचा रत्ना काका करून टाकला.

माणूस साधारण पन्नाशीचा असेल. केस रोज डाय करायचे म्हणून काळे कुळकुळीत आणि राजेश खन्ना स्टाईलने विंचरलेले. साधारण साडेपाच फूट उंची. दिसायला सावळे.. म्हणून थोडे राकट. दाढीमिश्या प्रकारचा मनापासून तिरस्कार, टोकदार नाक, तिखट आणि तीक्ष्ण नजरेचे डोळे, इस्त्री केलेला पांढरा रिक्षावाल्याचा पोशाख. किडकिडीत शरीरयष्टीचे आणि अगदी प्रसन्नतेने फिदीफिदी हसणारं असं रत्ना काकांचं व्यक्तिमत्व..  आता रत्नाकर रिक्षाबद्दलही सांगायलाच हवं – काळी-पिवळी अशी नेहमीच्या धाटणीतली रिक्षा पण तिच्या सर्वांगावर शेकडो ओरखडे – आता ते कसे आले हे ह्याचा तो आतमध्ये लाकडी पाटावर ठेवलेला गणपती हा एकमेव आय-विटनेस असेल. आधी म्हटल्याप्रमाणे रिक्षाला मीटर नाही. रिक्षाच्या उजव्या आरशाला साधारण ५-६ क्रॅक्स पडलेले.. “तुमच्या शाळेला रविवारी सुट्टी असते तेव्हा मी नवीन आरसा बसवणार आहे” असं आम्ही डे-केअर सेंटर मध्ये असल्यापासून ऐकत आलोय. आता आमची शाळा संपली, सगळ्यांची २-२ ग्रॅज्यूएशन्स कम्प्लीट झाली. रिक्षा जोरात मारली कि किंवा ती धुताना/पुसताना ही काच निखळून कशी पडत नाही हा मला नेहमी पडणारा प्रश्न. जो अर्थातच मी कधीही काकांना विचारला नाही. रिक्षा मध्ये एक लोकसत्ता, मटा आणि सकाळची वेळ असेल तर निदान ७-८ तरी शेंगदाण्याच्या पुड्या दिसत.

“अरे सरड्याची धाव कुंपणापर्यंत. मी काय लांबची भाडी घेत नाही बाबा.. शाळेपर्यंत आणि स्टेशनपर्यंत  होतात ११, जोगेश्वरीपर्यंत ३५ ते ४७..  ते मी ट्रॅफिक प्रमाणे ठरवतो. अजून लांब म्हणजे कधी तुला आणि गौरीला कांदिवली ला मामाकडे घेऊन जायचं त्याचे होतात ९० ते १०५, बाकी शांताचं ऑफिस २३ रुपये, आपल्या डॉक्टर परांजपेंना हॉस्पिटल पर्यंत कधी सोडावं लागलं तर २६. हवाय कशाला मीटर?” मीटर कधी लावणार ह्यावर हे काकांचं ठरलेलं उत्तर. हे आमच्या काही होतकरू नट मित्रांनी अगदी पाठ करून ठेवलेलं आणि रत्ना काकांसमोर त्यांच्याच टोन मध्ये बोलून ते त्यांची हुर्यो उडवायचे. मग काकांनी “अरे.. लवकरच बसवणार आहे नवीन मीटर” असं सांगायला सुरवात केली. पण हा मीटर कधी त्यांच्या रिक्षात आला नाही. २-३ वर्ष अशीच गेली आणि मग काकांनी एक नवीनच टूम काढली, “ते मीटर बकवास असतात म्हणे.. शासनाने सांगितलंय त्याऐवजी डिजिटल मीटर बसवून घ्यायला! एक मित्र आहे माझ्या ओळखीच्यातला त्याच्याकडून बसवून घेणारे मी!!” पेपर मध्येही तेव्हा डिजिटल मीटर बद्दल खूप काही चांगलं चांगलं छापून येतसे. आम्हा सगळ्यांना आधी रत्ना काका सिरीयस झाला ह्या बाबतीत असं वाटायचं पण तो फुटलेला उजवा मिरर आणि डिजिटल मीटर काकांनी बिलकुल बसवून घेतले नाहीत. लोकं कितीही नावं ठेवूदेत पण आपण मीटर बसवून घ्यायचा नाही हे त्यांनी ठरवलेलंच बहुदा. पण त्यामुळे त्यांचं कधी अडलंय असंही मी कधी ऐकल्याचं आठवत नाहीये. एरव्ही ५० पैसे आणि १ रुपयासाठी घासाघीस करणाऱ्या लोकांना ही गोष्ट चालायची ह्याचं मला अजूनही नवल वाटतं

फावल्या वेळात नाक्यावर किंवा तेजपाल स्कीमच्याच टपरीवर चहा मारणं, समोर विजय स्टोअर्स कडून २-२ रुपयाच्या शेंगदाण्याच्या पुड्या विकत घेणं आणि येणाऱ्या जाणाऱ्याला अडवून त्याच्याकडून सिगरेट उकळून चकाट्या पिटत बसणं हा रत्नाकाकांचा टाईमपास. तेजपाल स्कीम पासून चालत १० मिनिटांवर पार्ले टिळक विद्यालय शाळा आहे. शाळेची एक बॅच १२:३० ला भरते तेव्हा कधी कधी ११:३० पासूनच रत्नाकाका प्रचंड म्हणजे प्रचंड बिझी असतात. मुलांना फक्त शाळेत सोडणं एवढंच त्यांचं काम नव्हे तर काही नाठाळांच्या प्रगती पुस्तकावर, शिक्षकांनी आई वडिलांना कळावं म्हणून दिलेल्या शेऱ्यावर, २७ किंवा २९ चा पाढा १० वेळा लिहिण्याच्या शिक्षेवर “पालक” म्हणून सही करणं हे कामही ते अगदी मनापासून करत. मी आणि बाजूचा निनाद दादा असंच एकदा रत्नाकाकांकडे सही मागायला म्हणून गेलो होतो तर “भोसडीच्यांनो, तुमचे दोघांचेही बाप माझ्याकडेच यायचे  रे तुमच्या आजोबांची सही मार म्हणून मस्का लावत. तुमच्या लेकांना पण घाला आता पार्ले टिळकला.. काय??” असं काकांनी ऐकवलं होतं आम्हाला. तेव्हा मी चौथीत होतो आणि निनाद दादा सहावीत!

आमच्या पिढीची आणि रत्नाकाकांची एक गजब केमीस्ट्री आहे. आम्हाला सगळ्यांनाच ते आमच्या आई किंवा बाबांच्या नावावरून ओळखतात. मला ते अजूनही राजनचा मुलगा म्हणून ओळखतात, निनाद दादा ला राम्याचा पोरगा, शांतीची मुलगी म्हणजे आमची मैत्रीण राधा.. अशी समीकरणं त्यांना पाठ आहेत. त्यामुळे आम्ही लहान असताना आम्हाला आमच्या मित्र मैत्रिणींच्या आई बाबांची नावं पण आपसूकच कळत गेली. रत्नाकाकांची आणि आम्हा सगळ्यांची खूपच गट्टी जमली होती. ते बऱ्याचदा शाळेतल्या मुलांना शनिवारी संध्याकाळी जुहू चौपाटी ला घेऊन जात तर कधी एअरपोर्ट वर एक फेरफटका मारायला नेत. त्यामुळे सगळ्यांचाच त्यांच्यावर फार जीव. बरं ह्यासाठी कधीही त्यांनी त्या मुलांच्या आई- बाबांकडे पैसे मागितले नाहीत. शनिवारी दुपारी चार ला गेलेली गॅंग संध्याकाळी साडेसात ला परत येई तेव्हा प्रत्येकाच्या हातात म्हातारीचे केस, बर्फाचा गोळा, चिंचेच्या त्या छोट्या छोट्या गोळ्या असा काही ना काही खाऊ असे! आम्ही काही काकांच्या खास मर्जीतली मुलं होतो. आम्हाला बऱ्याचदा ते लहर आली की रिक्षात कडेला खोचून ठेवलेल्या त्या पुड्यांपैकी, एक शेंगदाण्याची पुडी द्यायचे. आम्ही लहान होतो तेव्हा हा एक मनमुराद आनंद होता तो अगदी कॉलेजमध्ये जायला लागल्यावरही तसाच राहिला.. काकांच्या रिक्षामध्ये एक डबा पण असे त्यात खजूर आणि मनुका असत. शाळेतल्या मुलांना खारे शेंगदाणे वगैरे देऊ नका अशी काही मुलांचे आई बाबा तक्रार करत तेव्हा मुलांना खाऊ म्हणून हा डबा ते पुढे करायचे. “भोसडीच्यांनो! तब्येतीत रे.. बाकी मित्र मैत्रिणींना पण ठेवा थोडं.” असं प्रेमाने दटावून सांगायला ते कधी विसरायचे नाहीत. माझ्यासारख्या बऱ्याच जणांना आम्ही अगदी शाळेत जाईपर्यंत भोसडीच्या ही शिवी आहे हे माहितीच नव्हतं; इतकं ऐकून ऐकून त्या शब्दाबद्दल प्रेम निर्माण झालेलं. मी आणि निनाद दादा तर नंतर नंतर मुद्दामून काकांना रागे आणायचो जेणेकरून आपली फेवरेट शिवी ते हासडतील…  रत्ना काका अगदी रिझवी कॉलेजच्या दिवसांपर्यंत माझ्यासोबत होते. सकाळी नेहमीप्रमाणे कॉलेज ला निघायला उशीर झालेला असे आणि रत्नाकाका अगदी नलराजासारखे धावून येत. तिकडे मला स्टेशन ला सोडलं कि मी लगेच ट्रेन पकडून बांद्र्याला जायचो. ४ वर्ष कॉलेजला वेळेवर पोहचायचं क्रेडिट रत्नाकाकांना द्यावंच लागेल. तीच गत निनाद दादाची.. तो माझ्यानंतर अर्ध्या तासाने निघायचा तेव्हा मला सोडून झालं कि काका लगेच रिक्षा आमच्या केदारनाथ बिल्डिंग पाशी पुन्हा घेऊन येत. मला एक गोष्ट आठवते ती म्हणजे मी तेव्हाही वॉलेट जीन्सच्या मागच्या खिशात ठेवायचो आणि त्यावरून जवळपास रोजच मला रत्ना काका झापायचे. “अरे ट्रेनमध्ये हे पाकीट कोणीतरी मारेल हे तर झालंच पण गाढवा सायंटिफिक कारण पण आहे त्याला. ते पाकीट आधी पुढे घे पाहू!” कुठून काही नवीन ऐकलं कि आम्हावर ते दादागिरी करून सांगण्यात काकांना मोठी मजा येत असे. वॉलेट मागच्या खिशात नको, चालत्या रिक्षातून वाचन नको डोळे खराब होतात ह्या त्यातल्याच काही गोष्टी. मला कॉलेजला जाताना रिक्षातच पेपर वाचायला वेळ मिळायचा आणि ह्यामुळे बऱ्याचदा चष्म्याचा नंबर वाढेल हे ऐकावं लागायचं “काय वाचतोयस? अग्रलेख?? सोड ते.. आज काही केतकरांना जमलं नाहीये खास! पाहिलं पान वाचलंस? पेट्रोल ७ रुपयांनी महाग झालंय.. भोसडीच्यांनो, लूटा आम्हाला”

मी २०१२ला ग्रॅज्युएट आणि त्याच दरम्यान जून- जुलै कडे रत्ना काकांची पहिल्या रोड वरची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली. काका अचानक गायबच झाले.. कुणालाही काहीही न सांगता. काहीजण म्हणाले कि त्यांनी बिल्डरला जागा विकली म्हणून तर काही लोकांचं मत होतं की ते सगळं काही सोडून मुलाकडे ठाण्याला राहायला गेलेयत. तेव्हाच नेमकी पार्ले-सांताक्रूज कडच्या बिल्डिंग च्या उंचीवरती कोर्टाची ‘साईट रिस्ट्रिक्शन ऑर्डर’ काय निघाली आणि काकांच्या बिल्डिंगचं काम रखडलं ते रखडलंच. हे रिडेव्हलपमेंट नाटक चांगलं ४ वर्ष चालू होतं. दरवेळी मी डिसेंबरला जायचो तेव्हा नेहमीच्या टपरीवर कटींगला जाताना ही अर्धी, ३ मजल्यापर्यंतचं बांधकाम झालेली इमारत दिसायची पण तिच्या आणि काकांच्या स्टेटस बद्दल काही खात्रीलायक माहिती मिळत नव्हती. ४ वर्ष अशीच गेली.

२०१६ च्या डिसेंबर मध्ये मी मुंबईला आलो तेव्हा नुकतीच सज्ज झालेली रत्नाकाकांची हेमलता सोसायटी चांगली सातमजली रुबाबात, दिमाखात उभी होती तरीही काकांचा काही थांगपत्ता नव्हता. पण आमची भेट होणार होती.. रत्ना काका आणि माझी शेवटची भेट मागच्या वर्षी (२०१७) जानेवारीतली. माझ्या इंडिया ट्रिप चा तो शेवटचा दिवस होता आणि मी एअरपोर्ट ला निघणार तेव्हा सोडायला आत्या, मामा, काका, भाऊ- बहीण असे सगळेच आलेले. बाबांनी नेहमीप्रमाणे टॅक्सी चा घोळ घातला आणि इतका सगळं लवाजमा न्यायचा त्यामुळे एक वाहन आम्हाला कमी पडलं. शेवटी ही सगळी मंडळी आणि ३ मोठ्याल्या बॅग्स २ टॅक्सी मध्ये बसुन एअरपोर्टकडे छूमंतर झाले आणि मी, आई आणि बाबा थांबलो. हे म्हणजे माझ्या बाबांच्या शब्दात सांगायचं तर गणेशचतुर्थीला मूर्तीचा पत्ता नाही पण पूजेचं साहित्य रेडी! रिक्षा तर रिक्षा टॅक्सी तर टॅक्सी जे मिळेल ते करायचं ठरलं. आमच्या तेजपाल स्कीमच्या रिक्षावाल्यांची एक खासियत आहे. साधारण ५ ते ७ च्या संख्येने हे आपापल्या रिक्षा घेऊन गप्पा मारत असतात पण कुठे जायचं म्हणून गिऱ्हाईक आलं तर एक डोळा बारीक आणि गाल फुगवून मान आडवी घुमवत “नाही नाही” अशी खूण करतात. ४-५ जणांची नकारघंटा ऐकल्यावर अचानक समोरून रत्नाकाकाच आले. बाजूच्या निनाददादाला स्टेशनवरून घरी परतायची सुबुद्धी आत्ताच यावी हा हि काय मोठा योगायोग. निनाद दादा उतरल्यावर आम्ही तिघंही बसलो त्या रिक्षा मध्ये आणि सुसाट निघालो. मी रिक्षात बसताना हळूच जीन्सच्या मागच्या खिशातलं वॉलेट काढून पुढच्या खिशात कोंबलं. ह्यावेळी रत्नाकाकांच्या चाणाक्ष नजरेने हे हेरलं नाही ह्याचं मला खूपच वाईट वाटलं. नजरेची धार बोथट होत चालल्याची ती एक खूण होती. बिल्डिंगचं काम २ आठवड्यांपूर्वीच कम्प्लीट झालं होतं आणि परवाच NOC मिळाल्याने काका राहायला आले होते. चार वर्ष म्हणे ते बांद्र्याला होते. घरापासून एअरपोर्ट पर्यंत जेमतेम १५ मिनिटांचा प्रवास तो.. खरंतर खूप काही बोलायचं होतं पण वेळच नाही मिळाला. “राजन, तुझा ना रे हा?.. फार फरक पडलाय चेहऱ्यात.”

दोन्ही रत्नाकारांच्या बाबतीत मात्र काहीच बदललं नव्हतं – काका आणि त्यांची रिक्षा अगदी जसे होते तसे! काकांचा आवाज थोडा कापरा होऊ लागलाय आणि उजव्या आरशामध्ये एक दोन क्रॅक्स ची भर पडलीये असं मला उगीचच वाटून गेलं. एका कोनाड्यात लोकसत्ता, मटा आणि एक शेंगदाण्याची पुडी दिसल्यावर अगदी आपली माणसं दिसल्यावर होतो तेवढाच आनंद झाला मला. बसल्याबसल्या समोरच्या डावीकडच्या हॅन्डल वरची धूळ झटकत मी म्हटलं “काय काका, मीटर बसवलं नाहीत अजून”. “अरे, फक्त मीटरचं काय घेऊन बसलास. पुढच्या वेळी तू येशील तेव्हा पे-टीएम पण सुरु करणारे. हल्ली डिजिटल मनी मध्ये सगळे व्यवहार चालतात म्हणे!” रत्नाकाकांनी सुर्र्कन एक लेफ्ट टर्न मारला आणि रिक्षा पुढे दामटवत हसत हसत म्हणाले. ह्यावर मी, आई, बाबा आम्ही तिघंही काहीही बोलू शकलो नाही. खोटं हसणंही आम्हाला तेव्हा जमलं नाही. ‘रत्नाकर रिक्षा’ मध्ये ही डिजिटल क्रांती अशक्यप्राय आहे हे आम्हाला तिघांनाही माहिती होतं. समोरच्या लाकडी पाटावर  गणपतीच्या बाजूला ठेवलेल्या त्या Nokia-3310 वर रत्नाकाका पे-टीएम कसं काय वापरणारेत हे त्या गणरायालाच ठाऊक!! एअरपोर्टपाशी रत्नाकाकांनी सोडलं आणि मी नमस्कार करायला वाकलो तर ती उरलेली शेवटची शेंगदाण्याची पुडी त्यांनी माझ्या हातात दिली. “प्रगती करा रे गोऱ्यांच्या देशात.. आनंदाने रहा!” काका एकदम हसत म्हणाले. बाबांनी दिलेली ५० रुपयांची नोट त्यांनी नाकारली आणि “भेटूच राजन उद्या.. आता आहेच मी इथे!” असं म्हणून ते निघालेसुद्धा. समोरच्या कडून शब्दशः शून्य अपेक्षा, राग-लोभ-हेवा ह्याचा लवलेश ही नाही असं एखाद नातं असू शकतं हे  रत्नाकाकांमुळे मला कळलं. अशा निर्व्याज नात्यांबद्दल मला वाटणारं कुतूहल अगदी तेव्हा पासूनचं..

इथे अमेरिकेत शेंगदाण्याची पुडी वगैरे मिळत नाही पण काकांनी लावलेली शेंगदाण्याची सवय इथे इंडियन ग्रोसरी स्टोअर मध्ये साडेतीन डॉलरला खारे शेंगदाणे मिळतात ती घेऊन मी भागवतो. दर शुक्रवारी कुठे बाहेर उंडारायला गेलो नसलो तर ऑफिसहून घरी येताना न चुकता मी हे शेंगदाणे विकत घेतो.. बिल केल्या केल्या लगेच तो डबा उघडतो आणि घरी परतताना टपाटप एकेक दाणा तोंडात टाकतो तेव्हा दरवेळी रत्नाकाकांची आठवण येते. तशीच आजही आली म्हणून हा छोटासा लेखनप्रपंच..

आज मात्र एक नवीनच प्रकार झाला.. साडेतीन डॉलरचं ते शेंगदाण्याचं पॅक आता पाच डॉलरचं झालंय. माझ्याही मनात नकळत येऊन गेलं – “एवढ्याश्या शेंगदाण्यांना पाच डॉलर?? भोसडीच्यांनो, लूटा आम्हाला!!”

– निखिल असवडेकर

कोबाल्ट ब्लू – सचिन कुंडलकर

Screen Shot 2017-08-27 at 12.28.56 AM.png

 

सचिन कुंडलकरचे रेस्टाॅरंट, गंध, निरोप, हॅपी जर्नी, राजवाडे ॲंड सन्स हे सगळे पिक्चर्स मी अनेकदा पाहिलेयत. ह्या माणसाचा कथा मांडणीत जबरदस्त हातखंडा आहे. सचिन कुंडलकरच्या विकीपीडीया पेजवर जेव्हा कोबाल्ट ब्लू विषयी वाचलं तेव्हा हे पुस्तक लगेचंच आॅर्डर केलं. कोबाल्ट ब्लू.. आपलं अस्तित्व अबाधित ठेवून, सरळ आकाशाशी, त्याच्या व्याप्तीशी सलगी करणारा हा रंग. कोबाल्ट ब्लू चाहिरोही तसाच आहे.. तनय आणि अनुजासाठी पूर्णत्वाची ओळख घेऊन आलेला, चेतना जागवणारा, प्रेमाची ओळख करून देणारा, आकाशासारखा सगळीकडे सामावलेला..

तनय आणि अनुजा ह्या दोन सिबलिंग्जची ओळखकोबाल्ट ब्लूमुळे अर्थात ह्या तिसऱ्या निनावी हिरोमुळे आपल्याला होत जाते.

ह्या नायकामुळे दोन भावंडांच्या आयुष्यात काय काय होतं आणि ही दोघं ह्या बदलाकडे कशा नजरेने बघतात ह्याची कथा म्हणजेचकोबाल्ट ब्लू‘.  बहीणभाऊ म्हणून एकमेकांमध्ये आपुलकी असली तरी दोघंही एकमेकांच्या पर्सनल आयुष्यात काय चालुए या बाबतीत पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. आईवडीलही अगदीट्रॅडीशनलविचारसरणीतले! त्यामुळे घरच्यांपाशी व्यक्त होण्याला खूप मर्यादा आहेत. ह्या दोघांच्या आयुष्याच्या कॅनव्हासवरचं त्यांचं हक्काचं स्वत:चं चित्र काही कारणांनी विस्कटतंय ह्याची स्वतंत्ररित्या जाणीव दोघांनाही आहे आणि नवा कॅनव्हास घेऊन पुढे जाण्याची.. त्यावर नवं चित्र रंगवण्याची उमेद दोघंही बाळगून आहेत.

सचिन कुंडलकरने हे पुस्तक वयाच्या २२व्या वर्षी पूर्ण केलंय ही बाब खरंच चकित करून टाकते! इतक्या लहान वयात इतकी मॅच्युरीटी, इतकालिबरलदृष्टीकोन कुणाकडे कसा काय असू शकतो!! पुस्तकाचा फर्स्ट हाफ तनय त्याची बाजू मांडतो तर सेकंड हाफ अनुजा. पुस्तक ह्याच क्रमाने वाचलं तर कथेची सांगड अगदी नीट घालता येते. अनुजाचा भाग तर फारच अप्रतिम झालाय.. तिचा जगण्याबद्दलचा व्यापक दृष्टिकोन, तिचं अनुभवकथन, तिची प्रचलित समाजाबद्दलची आणि घरच्यांबद्दलची मतं, जबाबदारीची जाणीव.. सगळंच संवेदनशीलरित्या लेखकाने मांडलंय. कित्येकदा आपण एकेका पॅरेग्राफवर खूप वेळ रेंगाळत बसतो. अप्रतिम पुस्तक! सचिन कुंडलकर, हॅट्स आॅफ!!

रक्ताचं नातं

आदित्य रेगे आणि माझी मैत्री नक्की कशी आहे हे खरंच मला नाही सांगता येणार.. आठवड्यातून किमान एकदा फोनवर तासभर गप्पा माराव्यात किंवा कारण नसताना उगाचच टपलीत वगैरे द्यावी एवढी आमची मैत्री घट्ट नाही.. हे अमान्य करण्यात काहीच अर्थ नाही. पण फक्त एकमेकांच्या वाढदिवसाला ’Happy Birthday Mitraa’ असा एक औपचारिकता म्हणून व्हॉट्सअॅप मेसेज करण्याएवढी ही मैत्री उथळही नाही. पण हो, आम्ही बहुतेक तसे बऱ्यापैकी चांगले मित्र असू.. म्हणजे आम्ही अगदी ठरवून महिन्यातून एकदा तरी लंच किंवा डिनर ला भेटतो. एकमेकांविषयी, एकमेकांच्या घरच्यांची ख्याली-खुशाली वगैरे विचारपूस करतो. ईशा.. ही ईशा म्हणजे आदित्यची गर्लफ्रेंड.. ती ही आमच्याबरोबर बऱ्याचदा असते. ईशा माझी खूप चांगली मैत्रीण झालीये.. एकतर तिचं ऑफिस माझ्या ऑफिसच्या अगदी समोर त्यामुळे लंचला बरोब्बर १२:३०  वाजता ‘कॉम्प्लेक्स’च्या ‘कॉमन कॅफेटेरिया’मध्ये आम्ही बऱ्याचदा एकत्रच जेवायला बसतो. आदित्यची आदी, आदू, आरे, रेग्या, आद्या अशी अनेक टोपणनावं आहेत पण मी मात्र एवढी २ वर्ष आमची ओळख असूनही त्याला आदित्यच म्हणतो. हे नाव पूर्ण घेणारा मी एकटाच आहे असं ईशाचं म्हणणं.. असो!!

आदित्यची आणि माझी ओळख वॉशिंग्टन डी सी ला आम्ही ‘तिघांची गोष्ट’ असं एक नाटक बघायला गेलो होतो तेव्हा झाली. आई बाबा आणि तरुण मुलगा ह्यांची ती गोष्ट. तरुण मुलांच्या बदलत्या विचारधारेशी जुळवून घेणं आई बाबांना कसं कठीण जातं हा नाटकाचा विषय. नाटकाबद्दल नंतर आदित्यने माझ्याशी एवढ्या गप्पा मारल्या की प्रत्येक गोष्टीचा हा एवढ्या सारासार पद्धतीने विचार कसा काय करू शकतो ह्याचं मला खूप कौतुक वाटलं. नंतर दीड-दोन महिन्यातून एकदा नाटक किंवा सिनेमा आमचा ठरलेला असायचा. आदित्य प्रत्येक नाटक किंवा सिनेमा बघताना त्याची एक वही सोबत ठेवायचा आणि त्यात नोट्स लिहायचा. हा प्रकार आधी मला खूपच नवीन आणि मजेशीर वाटलेला.. नंतर सवय झाली. “निखिल, ‘रिलेशन’.. नातं..  हा माझा आवडता टॉपिक आहे. ह्या टॉपिकवर आपण दोघं मिळून लिहायचं का काही छान? हा.. सासू सुनेला मारत्येय – नवरा रडतोय वगैरे भंकस नाही. जे अगदी खरंखुरं.. तुझ्या माझ्या घरी होतं.. जे रिऍलिस्टिक वाटतं ते लिहू.. काय??” मी आपलं त्याचं मन राखायला म्हणून “हो, नक्की लिहू की..” वगैरे म्हणायचो पण आदित्यच्या डोक्यात सारख्या काय ना काय कल्पना चालू असायच्या. तो काहीतरी कथानकाचा खूप सिरियसली विचार करतोय असं मला दरवेळी वाटायचं.

ईशाही कधी कधी यायची आमच्याबरोबर नाटकाला किंवा पिक्चरला.. आपण उगाच ‘थर्ड व्हील’ कशाला व्हा म्हणून मी एक-दोनदा ‘कंटाळा येतोय रे, जाऊदे’ वगैरे कारणं सांगायचं प्रयत्न केला तर ‘चल रे, आम्ही काय हनिमून ला चाललोय का?’ हा आदित्यचा ठरलेला प्रश्न असायचा. असेच महिन्यांमागून महिने निघत होते.. एक दोन आठवडे मला ईशा थोडी उदास झालीये असं वाटायला लागलं. जेवताना अखंड बडबड बडबड करणारी ईशा हल्ली एकदमच शांत झाली होती. माझ्या फालतू जोक्सवर पण मला अॅटीट्युड न दाखवता हसायला लागली तेव्हा काहीतरी बिनसलंय हे मला कळलंच. एके दिवशी दुपारी मी तिच्याकडून सगळी माहिती काढून घेतली – ” अरे, आदित्यच्या आईला डेंग्यू झालाय. तसं सिरियस नव्हतं आधी पण ‘ब्लड प्लेटलेट्स काउन्ट’ अचानक घसरला आणि त्यांना आय. सी. यू. मध्ये ठेवलंय ह्या आठवड्यापासून.  जीवाला धोका नाहीये पण तब्येत खालावलीये त्यांची. डेंग्यू ची ट्रीटमेंट म्हणून पुढच्या आठवड्यापर्यंत ‘ब्लड ट्रान्सफ्युजन’ केलं पाहिजे असं डॉक्टर्सचं मत झालंय. आदित्यच्या आईचा ब्लड ग्रुप A-ve आहे.. रक्ताचीही व्यवस्था होईल म्हणालेयत डॉक्टर पण आदित्यने सगळं खूपच मनाला लावून घेतलंय. आत्ता ३-४ दिवसांपूर्वी त्याने ‘इमर्जन्सी केस’ सांगून ‘ट्रॅव्हल I-20’ मागवून घेतला आणि तो उद्यापासून चाललाय मुंबईला २ आठवड्यांसाठी. आदित्यने मला हे कोणालाही सांगायचं नाही म्हणून बजावलेलं पण जाऊदे.. मलाही आता एकटीला सहन करणं कठीण होतंय.”

आदित्यने हा निर्णय इतक्या तडकाफडकी का घेतला हे मला कळलंच नाही. म्हणजे आदित्यसारखा इतका प्रॅक्टिकल विचार करणारा माणूस इतका टोकाचा इमोशनल होऊ शकतो? रक्ताची नाती कदाचित माणसाची मती कुंठित करत असावीत. मी ठरवलं.. आज म्हणजे आजच ह्या विषयावर आदित्यशी बोलायचं. त्याला मेसेज केला की आज रात्री जेवायला भेटायचं का? आदित्य लगेच उद्या रात्री निघणार होता पण त्याने ‘हो, भेटूच’ असा रिप्लाय केला.

बहुतेक कुटुंबीयांचा विषय आला की आपण सगळेच सरळ विषयाला हात घालायला कचरतो त्यामुळे पहिली २०-२५ मिनिटं आम्ही क्रिकेट वर्ल्ड कप, युनिफाॅर्म सिविल कोड, ट्रिपल तलाक वगैरे विषयांवर बोलत बसलो. हळूहळू गाडी रुळावर येऊ लागली. ईशा ला कुठे ‘बॉल्टिमोअर’हून तिच्या काकांकडून काही सामान आणायचं होतं ते काम आदित्यने माझ्यावर सोपवलं. आदित्य आता बऱ्यापैकी कंफर्टेबल झालाय म्हटल्यावर मी आदित्यला म्हटलं, “हे बघ आदित्य. मी पाहिलेल्या लोकांपैकी कदाचित तू सगळ्यात जास्त प्रॅक्टिकल माणूस असशील. तू असा निर्णय घेतोयस? काकूंना डेंग्यू झालाय, ‘ब्लड प्लेटलेट्स काउन्ट’ ही घटलाय आणि आई म्हणून तुला त्यांची काळजी वाटणं अगदी साहजिक आहे. पण हा काही दुर्धर आजार नव्हे. त्यात तुझे आई बाबा मुंबईला राहतात. मुंबईत एक्स्पर्ट डॉक्टर्सची काही वानवा नाहीये. आईला A-ve ब्लड हवंय वगैरे सगळं मान्य आहे पण मित्रा, इट्स अ सिटी ऑफ टेन मिलियन पीपल!  रक्ताची व्यवस्था कशीही होऊ शकते!!  ब्लड ट्रान्सफ्युजन नंतर काकू पूर्ण बऱ्या होणार असं डॉक्टर आत्ताच म्हणतायत. तुला राग येईल, थोडं स्पष्टच बोलतो.. पण ह्यासाठी तू डिसेम्बरची सुट्टी आत्ता जूनमध्ये वापरतोयस आणि तुझ्या घरचे लग्नासाठी डिसेंबरच्या तारखा बघत होते तर लग्नाचा निर्णय पुढे ढकलतोयस हे थोडं जास्त इमोशनल वाटतंय. अरे, थोडा ईशाचा तरी विचार कर. ती डिसेंबरसाठी  केवढी खुश आहे माहितीये ना तुला?”

मी कदाचित भावनेच्या भरात अजून चार शब्द सुनावले असावेत आदित्यला.. आता नक्की आठवत नाहीये. तो पूर्णवेळ माझं शांतपणे ऐकून घेत होता.. नंतर मी थांबल्यावर त्याने एक दीर्घ श्वास घेतला. समोरचं पाणी गटागटा प्यायला आणि म्हणाला. “हे नातं माझ्यासाठी खूप महत्वाचंय निखिल. तू म्हणतोस तेही पटतंय मला पण हे नातं रक्ताचं असावं ही घटनाही मला अमान्य नाही.. माझा ब्लड ग्रुप A-ve आहे हा फक्त योगायोग आहे रे. हे करावंच लागेल. शी इज.. शी इज नॉट माय रियल मदर. आय वॉज अडॉप्टेड!! “

मी अगदी सुन्न! घशाला कोरड पडली आणि पाणी प्यायला ग्लास घ्यायला गेलो तर हाताला कंप सुटू लागला.. काय बोलावं काहीच कळेना.

हे रक्ताचं नातं आज कागदावर उतरावतानाही हाताला तसाच कंप सुटतोय.

 

-निखिल असवडेकर

 

कबीर, आजोबा आणि कृष्ण

परवा नेहमीप्रमाणे जुहू चौपाटीवर ४ वर्षांच्या कबीरला आजोबा गोष्टी सांगत होते. नेहमीसारखा तो आजोबांच्या खांद्यावर बसून दोन्ही हातांनी त्यांच्या टक्कल पडलेल्या डोक्यावर तबला वाजवत त्या गोष्टी ऐकत होता. “बाळा कबीर तो समोरचा सूर्य गायब केला होता कृष्णाने. काय समजलास!! आपलं सुदर्शन चक्र सोडलं त्याने सूर्यावर.. सूर्य गेला ना घाबरून. कृष्ण म्हणजे एकदम शक्तिशाली.. मागच्या आठवड्यातली गोष्ट आठवत्येय का तुला? त्याने काय केलं होतं सांग? कोणता पर्वत उचलला?” – “आजोबा, गोवर्धन ना??”..  “हां.. बरोब्बर. तर आता आपण हळूहळू लढाईच्या शेवटच्या गोष्टीकडे चाललोय. कर्णाने एक सापाचं विष असलेला बाण सोडला अर्जुनावर. तर ह्या कृष्णाने काय करावं? त्याने पायाने तो रथ जमिनीवर इतक्या जोरात दाबला  की रथ गेला बोटभर खाली.. कर्णाचा नेम चुकला आणि अर्जुन वाचला. “

 

“आजोबा कृष्ण हिरो आहे का कालच्या ‘काहो ना प्यार है’ मधल्या हृतिक रोशन सारखा?”

“कबीर बाळा ते हृतिक रोशन वगैरे चित्रपटातले हिरो. हा खराखुरा हिरो होता तेव्हा.. हृतिक रोशन पेक्षा ताकदवान. काय समजलास!!”

“कृष्ण कुठे राहतो आजोबा?”

“अरे भरपूर लांब..”

“आजोबा काल आपण घरी जाताना हृतिकच्या बंगल्यावरून गेलो. आज कृष्णाचा बंगला दाखवाल?”

“अरे राजा तो काय असा इथे राहणारे होय? त्याचं घर भरपूर लांब.. तिकडे वर. त्या ढगांच्या पल्याड!!”

“बापरे इतक्या वरती? पण मग तो आपल्या बरोबर का नाही राहात??”

“अरे तो देव आहे कबीर बाळा. त्याचं घर तिकडे आभाळात.. देव उंच वरती राहतात आणि तिकडून आपल्यावर लक्ष ठेवतात. कुणी चुकलं तर त्याला शिक्षा करतात. चांगलं काम केलं कि शाबासकी देतात.”

 

 

आजच्या निरव शांततेत कुणालाही कळणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घेत, हळूच देव्हाऱ्यातली श्रीकृष्णाची मूर्ती घेऊन कबीर आता ‘बाल्कनी’त आलाय. दोन्ही हातांनी त्याने कृष्णाला घट्ट धरून ठेवलंय.. बाल्कनीच्या छोट्याश्या खिडकीतून, त्या लांबटगोल चित्रविचित्र आकाराच्या ढगांकडे कबीर आता नजर लावून बसलाय. आपल्या निरागस चिमुकल्या डोळ्यांनी आरपार काही दिसतं का हे तो बघतोय. आजोबा दिसतात का ते शोधतोय .. कारण कुणाला “आजोबा कुठेयत?” विचारलं तर उत्तर मिळतंय – “आजोबा देवाघरी गेले!!”

 

 

 

– निखिल असवडेकर

अस्तित्व

‘संभाजी’, ‘स्वामी’ आणि ‘व्यक्ती आणि वल्ली’ वाचत आम्ही तरूण झालो.  बाकी भरपूर पुस्तकं वाचली, वाचत राहीन पण ही ३ विशेष जवळची. कधीपासून ह्या ३ पुस्तकांबद्दल काहीतरी लिहूया असा विचार करत होतो.. ‘मेमोरीयल डे’ ‘लाॅंग विकेंड’च्या विमान प्रवासात हा योग जुळवून आणलाच!! 😀 😀

जोशीज्

तो, आई आणि बाबा.. असं हे त्रिकोणी कुटुंब.. ‘जोशीज्‘!!

एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञान क्रांती आणि ग्लोबलायझेशनमुळे हा त्रिकोण व्हाॅट्सअॅपवर पण चितारला गेला होता.. अगदी खूप आधीपासून. फोनवर जे बोलणं.. त्याचाच पुढचा अध्याय  व्हाॅट्सअॅपवर!

प्रत्येक गोष्टीची ह्या व्हाॅट्सअॅप गृपवर अगदी खमंग चर्चा!

कोल्हापूरच्या राजारामपुरीतला त्यांचा छोटेखानी बंगला.. बंगल्याचं नावजोशीज्‘. बंगल्याचं तसंच ह्या व्व्हाॅट्सअॅप गृप चं आणि हो हौस म्हणून, हीचजोशीज्‘ ‘नेमप्लेटवॉशिंग्टन डी. सी. मधल्याकॅन्डलवूड अपार्टमेंट्सअपार्टमेंट नंबर C02 बाहेरही त्याने लावलीये.. ‘Welcome to Joshi’s’!!

२०१३ ला आई बाबांच्या लग्नाच्या वाढदिवसाला दोघांनाही त्याने स्मार्टफोन्स घेऊन दिले आणि फोनकॉल बरोबरच संवादाचं अजून एक माध्यमजोशीज्ना खुलं झालं. “आज मला घरी यायला उशीर झाला. संध्याकाळची नेहमीची बस चुकली.. झोपते आता. 😴😴 उद्या राजसकाकाला फोन कर त्याचा वाढदिवस आहे माहितीये ना?”, ” काय बाबा, न्यूज बघताय कि झोपलात? अर्णब काय म्हणतो? 😁आणि बरखा दत्त??😅😅“, “आज पावभाजी बनवायचा विचार आहे थोड्या वेळाने कॉल करतो गं आई 😬😬“, “फ्लोरिडा च काम झालं का? घरी पोहचलास का? झोप आता उशीर झाला असेल ना उद्या परत ऑफिस आहे ना सोन्या? 👍🏼अशा अगणित नानाविविध विषयांवरजोशीजवर मेसेजेसचा नुसता पाऊस! दर शनिवारचा सकाळचा मेसेजही ठरलेला.. स्काईप वर बोलायची वेळ ठरलेली म्हणून – ” काय रे? आलात का ऑनलाईन.. कि नेट प्रॉब्लेम?? 👊🏼“.. अगदी अजूनही!!

कालही त्याने अगदी न चुकता मेसेज केला.. “ऑफिसवरून आलो घरी.. आता उद्याची तयारी सुरु!  ☺️✌🏻🤘🏼Yo.. बिझी बिझी बिझी!!  उद्या सकाळी नको.. रात्री मेसेज करतो 😀🙋🏻‍♂️

आता रीना काय आईबाबांना माहित नव्हती का? पण तिलाही जोशीज् मध्येएन्ट्रीनव्हती.. अगदी अजूनही! जोशीज् मध्ये म्हणजेजोशीज् गृप मध्ये! रीना यादव.. मूळची उत्तर प्रदेशची पण शिक्षण वगैरे सगळं मुंबईत झालेलं.. आणि आता समीर बरोबर डीसी ला. आई बाबांना रीना बद्दल सांगताना समीर जाम कावराबावरा झाला होता. ‘रीनावरून जोशीज् मध्ये यादवी होणार कि काय अशी त्याला भीती होती पण आईबाबांनी हे सगळं मोठ्या मानाने स्वीकारलं.  बाकी आईबाबांची आणि तिची चांगली गट्टी जमली होती. बाबा मात्र एका मतावर ठाम.. “लग्नाचा निर्णय घाईगडबडीत घेण्यात अर्थ नाही. दोघंहीसेटलव्हा मग विचार करू.“ त्यात प्रॉब्लेम म्हणजे रीना चे आईवडील. ‘टिपिकलसनातनी यादवांप्रमाणेपच्चीस के पेहले तो बेटी कि विदाई होनी चाहिये|” हे त्यांचं मत. दोन्ही घरच्या ह्या वेगळ्या मतप्रणालीमुळे बिचाऱ्या समीरचं मधल्या मध्ये सँडविच झालेलं!! त्यामुळे लग्न ह्या विषयावर जशा फोनवर चर्चा व्हायच्या तशाचजोशीज्वर. कधी चर्चा कधी मतभेद कधी भांडण. समीरच्या बाबांचा एक डायलॉग म्हणजेकाय मस्त भैय्या आहे रे तुझा सासरा! टीव्ही वरच्या व्हिलन्स ला मागे टाकेल.. गाढवा रीनासमोर पचकू नकोस हे.. हाहाहा 😅“.  हा मेसेज समीरनेस्टारमेसेज म्हणून सेव्ह केलाय! 😁😂

वेळ: रात्रीचे ११:००, शनिवार ३ मार्च २०१७  स्थळग्रँड पोटोमॅक रिव्हरसाईड, वॉशिंग्टन डी.सी. :

आई, बाबा.. एंगेजमेंट झाली हाहाहा..☺️✌🏻 तुम्ही असता इथे तर केवढी मजा आली असती. खूप कल्ला केला आम्ही 😝😝 हे बघा फोटो..”

होभैय्यातर काय खुश 😬😬.. खूप फोटोज् काढलेयत त्यांनी माझ्या बरोबर. दीपक, निशा, अदिती, चिन्मयी सगळे आले होते. अनुपचा फ्लाईटचा झोल झाला काहीतरी तो येऊ शकला नाही.  तुम्हाला आणि अनप्या ला खूप मिस केलं. 😔😔

दुपारी एंगेजमेंट आणि संध्याकाळपासून पार्टी.. 😝🤘🏼🤘🏼हाहाहाहा! आता घरी निघू १० मिनीटात.. एवढा दमलोय. पडल्या पडल्या झोप येणारे! 😴😴उद्या सकाळी बोलूच इथे!!”

त्याचे डोळे पाणावले. टेबलवरची आईबाबांची फोटोफ्रेम आणि त्याजवळ ठेवलेले २ स्मार्टफोन्स त्याने बॅगमध्ये भरले. ‘आईबाबा, वाचताय ना माझे मेसेजेस?’ 

खिशातून फोन काढून त्याने परत व्हाॅट्सअॅपवर गृप ओपन केला. थोडा वेळ जुनेच मेसेजेस वाचत बसला..

११ सप्टेंबर २०१६, सकाळच्या ७:४५ ला समीरनेजोशीज्वर केलेला मेसेज – “काय रे, पोहचलात का घरी भोपाळहून?”

हा दोनब्लू टिक्सअसणारा त्याचा शेवटचा मेसेज.. मेसेज वाचला गेल्याची ॲकनाॅलेजमेंट आणि मग दोघांचेही रिप्लाय.  नंतर तेव्हापासून आजपर्यंत सगळे ह्याचेच प्रश्न आणि ह्याचीच उत्तरं!!

.. नियती निर्दयपणे आपली हक्काची माणसं आपल्यापासून तोडून नेऊ शकते.. पण नात्यांच्या संदर्भाचं काय? ते संदर्भ पुसट करण्याची ताकद कुणातही नाही! नियती काय.. अगदी आपल्यातही!!

  • निखिल असवडेकर